
आम्ही मुंबईला नेत असलेल्या वाहनांमध्ये दगडधोंडे, लाठ्याकाठ्या घेऊन जाणार नाहीत. पोटापाण्यासाठी लागणारे सामानच त्यात असणार आहे. त्यामुळे खबरदार आमचे ट्रॅक्टर अडवाल तर! आमची वाहने अडवल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बसू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, या मागणीवर आपण ठाम असून त्यावर आता कोणतीही तडजोड नाही, असे जरांगे म्हणाले. आरक्षणावर आता निकराची लढाई सुरू झाली आहे. मुंबईत आझाद मैदानावर उपोषण होणार असून आम्ही २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहोत. मुंबईला पायी जाणार आहोत. प्रवासाला किती दिवस लागणार ते माहिती नाही. त्यामुळे सोबत खाण्यापिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू असणार आहेत. त्यासाठी वाहने लागणार आहेत.
तर सामान काय डोक्यावर न्यायचे?
आंतरवालीहून मुंबईकडे पायी जाणार आहोत. लोकांच्या सोयीनुसार तेथे पोहोचणार. तिथपर्यंत उपाशीपोटी तर जाऊ शकत नाही. सोबत धान्य, खाण्यापिण्याच्या वस्तू, अंथरुण-पांघरूण, स्वयंपाकाचे साहित्य न्यावे लागणार आहे. हे साहित्य वाहनांमध्ये नाही न्यायचे तर काय डोक्यावर न्यायचे काय? सरकारने ही वाहने अडवण्याचा विचारही करू नये. वाहने अडवल्यास आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई, नागपुरातील घरासमोर बसू, असा इशारा जरांगे यांनी दिला.
तीन कोटी मराठे मुंबईत येणार
तीन कोटी मराठे आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानाशिवाय इतरही मैदाने आम्हाला लागणार आहेत. सरकारने परवानगी दिली तर चांगलेच, नाही दिली तरी आंदोलन होणारच! असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले. मैदाने अपुरी पडली तर समुद्राच्या किनार्यावर, मिळेल त्या जागेवर आंदोलनकर्ते बसतील. आरक्षण मिळाल्याशिवाय एकही मराठा मागे फिरणार नाही, असे ते म्हणाले. मराठा समाजाने आपल्या भल्यासाठी गटतट विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.





























































