
सामना ऑनलाईन, मुंबई
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय लिपिकांप्रमाणे मंत्रालयातील लिपिक व टंकलेखकांना 2 हजार 400 रुपये ग्रेड पे तत्काळ देण्यात यावे यासह अन्य काही मागण्यांसाठी मंत्रालय कर्मचारी संघटनेने 8 व 9 जानेवारी रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्याचा इशारा दिला.
मंत्रालय कर्मचारी संघटनेने मंत्रालयात मोक्याच्या जागेवर फलक लावून संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि निम्नश्रेणी व लघुलेखकांना पूर्वलक्षीप्रभावाने 4 हजार 600 रुपये ग्रेड पे तत्काळ देण्यात यावेत, तसेच लघुलेखकांना न्यायालयीन लघुलेखकांप्रमाणे व सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अंशदायी पेन्शनधारकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, तसेच पाच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात यावा व निवृत्तीचे वय 60 करण्याच्या मागणीसाठी संघटनेने दोन दिवस संपाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवारी दुपारी दीड वाजता लिपिक व टंकलेखक दुपारी दीड वाजता मंत्रालयाच्या आरसा गेटवर एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे आदी मागण्यांसाठी 5 जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. पण हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महासंघाने आंदोलन 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केले आहे.

































































