
सामना ऑनलाईन । पुणे
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अत्यंत प्रामाणिक मंत्र्यांच्या भूमिकेत दिसणारे व मालिकेत राणादाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्यावर पु.ना.गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्सला 25 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएनजी ज्वेलर्सने दस्ताने यांच्या विरोधात पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबत हे वृत्त दिले आहे.

मिलिंद दस्ताने व त्यांच्या पत्नी सायली दस्ताने यांनी औंध येथील पीएनजी ज्वेलर्सकडून उधारीवर 25 लाखांचे सोने, चांदी व हिऱ्यांचे दागिने घेतले होते. त्यांनी या दागिन्यांच्या बदल्यात पीएनजी ज्वेलर्सला चेक दिले होते. त्यातील एक चेक वठला व इतर सर्व चेक बाऊन्स झाले. मिलिंद दस्ताने यांचा भाचा निलेश प्रकाश दस्ताने हा पीएनजी ज्वेलर्समध्ये स्टोअर मॅनेजर आहे. त्याला मिलिंद यांनी त्यांना दागिने घ्यायचे आहेत असे सांगितले होते. मिलिंद हे प्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे तसेच निलेशने ते पैसे देतील याची खात्री दिल्याने स्टोअरचे मालक अक्षय गाडगीळ यांनी त्यांना उधारीवर दागिने दिले.
मिलिंद यांनी 4 मार्च 2018 ला 4.92 लाखांचे दागिने घेतले. त्यासाठी त्यांनी 2.88 लाखांचे दोन चेक दिले. त्यातील एक चेक वठला व दुसरा बाऊन्स झाला. त्यावेळी मिलिंद यांनी त्यांचा पुण्यातील एक फ्लॅट तीन कोटींना विकायला काढला असून लवकरच त्या पैशातून त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अक्षय यांना सांगितले. त्यानंतरही त्य़ांनी ही सबब सांगत पीएनजी ज्वेलर्समधून 25 लाख रुपयांचे दागिने घेतले. मात्र वर्ष उलटले तरी मिलिंद यांनी पैसे परत न केल्याने अक्षय गाडगीळ यांनी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.

























































