
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाण याच्यासोबत बुधवारी मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे. पूजाने इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले आहेत. यात पूजाचा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. अगदी मेहंदी सोहळ्यापासून ते संगीत नाईटपर्यंत प्रत्येक सोहळा पूजा-सिद्धेशने खास पद्धतीने साजरा केला. त्यामुळे पूजाचं लग्नही खास असणार अशी चर्चा होती. व्हायरल फोटोंमध्ये सिद्धेश मोती रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे तर पूजा गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवर पिवळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे. पूजाने नऊवारीवर पारंपारिक दागिने, केसात गजरा, हातात हिरवा चुडा घातला असून ती त्यात फार सुंदर दिसत आहे. तिच्या लग्नाला जवळच्या नातेवाईकांसह सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.





























































