
सामना प्रतिनिधी । कराड
कराड अर्बन बँकेच्या ग्राहक, खातेदार व सभासदांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रू. 18.50 कोटींच्या ठेवी नव्याने जमा केल्या आहेत. यापैकी कराड शहरातील शाखांमध्ये ठेवीदारांनी रू. 3 कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा करून बँकेवरील विश्वास दृढ केला आहे.
बँकेने ग्राहकांना आजवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तत्पर सेवा दिली आहे. दीपावली सणाच्या काळात बँकेची सर्व ए.टी.एम. सलग चोवीस तास सुरू होती. त्यामधून सणाच्या सात दिवसात जास्तीत जास्त उंबज, पुसेगाव, मसूर, सातारा व वडूज या पाच शाखांतील ए.टी.एम. मधून तीन हजारपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. तसेच एका दिवशी वडूज, फलटण, सातारा शहर, पुसेगाव, उंबज, रहिमतपूर या शाखांमधून पाचशे पेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. एका दिवशी उंबज शाखेच्या ए.टी.एम. मधून सर्वाधिक म्हणजेच सहाशे पेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत.
सणाच्या सात दिवसात बँकेच्या सर्व ए. टी. एम. मधून एकूण सदुसष्ठ हजाराहून अधिक ग्राहकांनी सणाच्या काळात बँकेच्या ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये अन्य बँकांच्या 55 हजार 500 ग्राहकांना आपल्या बँकेच्या ए.टी.एम. मधून रक्कम रू. 15 कोटी 68 लाख इतकी रक्कम कराड अर्बन बँकेमार्फत वितरीत करण्यात आली. आपल्या बँकेच्या ए.टी.एम.मध्ये तत्काळ कॅश भरणा करण्याची यंत्रणा बँकेने उभारली असल्याने ग्राहकांना अविरतपणे कॅश उपलब्ध होत असते. त्यामुळे बँकेच्या उत्तम, तत्पर आणि सुरक्षित ए.टी.एम. सेवेचा लाभ घेण्याकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो. हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव यांनी दिली.
बँकेचे कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कराड अर्बन बँकेला शंभर वर्षाची वैभवशाली अशी विश्वासार्ह परंपरा आहे. त्यामुळे ग्राहक, खातेदार व सभासदांशी बँकेशी असलेले नाते अधिकच दृढ आहे. बँकेने सातत्याने ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले असून ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिली जात आहे, त्याबाबत सेवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कराड अर्बन बँकेत ठेवी ठेवण्यास अधिक पसंती आहे. सकल जनांचा बँकेवर असणारा दृढ विश्वास यामुळेच बँकेने व्यावसायिक प्रगतीचे अनेक टप्पे अल्पावधीत गाठले आहेत.




























































