
5 बाद 112 अशी दयनीय स्थिती असतानाही मयांक अगरवालने कर्णधारास साजेशी जिगरबाज द्विशतकी खेळी करीत सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक उपांत्य लढतीत कर्नाटकला 407 ही धावसंख्या उभारून दिली. त्याने एकहाती किल्ला लढवत सौराष्ट्रचे कर्नाटकला 300 धावांत गुंडाळण्याचे मनसुबे उद्ध्वस्त केले. मयांकच्या खेळीनंतर कावेरप्पाने दोन आघाडीवीरांचे त्रिफळे उडवून सौराष्ट्रला हादरविले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सन प्रत्येकी 27 धावांवर खेळत होते. दुसऱया सामन्यात बंगालनेही मध्य प्रदेशविरुद्ध सर्वबाद 438 अशी दमदार मजल मारली. तसेच मध्य प्रदेशची 2 बाद 56 अशी सुरुवात झाली.
129 पैकी 108 धावा मयांकच्या
आठ फलंदाज बाद झाल्यावर त्याने डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्याने शेवटच्या दोन फलंदाजांबरोबर 129 धावांची भर घातली, पण त्यातील 108 धावा एकट्या त्याच्याच होत्या आणि या धावांत त्याने 12 चौकार आणि 5 षटकार खेचले.
तिसऱ्यांदा ठोकले रणजीत द्विशतक
- मयांकचे अडीच शतक अवघ्या एका धावेने हुकले. तो अडीचशेवी धाव काढतानाच धावबाद झाला.
- त्याने आपल्या रणजी कारकीर्दीतील तिसरे द्विशतक साजरे केले. कर्णधार म्हणून हे दुसरे द्विशतक होय.
- या मोसमात त्याने 8, 73, 51, 50, 117, 14, नाबाद 52, 10, 208, 20 आणि 83 अशा खेळय़ा केल्या होत्या.
- या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱया दिल्लीच्या ध्रुव शौरीला (859) मागे टाकले. त्याच्या खात्यात आता 935 धावा जम़ा
- या मोसमात दोन द्विशतके झळकावणारा मयांक एकमेव फलंदाज आहे. हे त्याचे मोसमातले तिसरे शतकही होते. केवळ शतकांच्या बाबतीत हिमाचलचा प्रशांत चोप्रा (5 शतके) त्याच्यापुढे आहे.


























































