सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची आघाडी होताच बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुस्लिम आरक्षणाचे कार्ड खेळले आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या मुस्लिमांसाठी आरक्षणाचा स्वतंत्र कोटा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मायावती यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुस्लिमांसाठी आरक्षणाच्या स्वतंत्र कोटय़ाची मागणी केली.
केंद्र सरकारने खुल्या वर्गातील गरीबांसाठी 10 टक्के आरक्षण दिले असून त्याचे आम्ही स्वागत केलेच आहे; मात्र त्या आरक्षणाचा फायदा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना मिळणार नाही, असे सांगत मायावती यांनी मुस्लिमांसाठी आरक्षणाच्या स्वतंत्र कोटय़ाची मागणी केंद्र सरकारकडे केली.
1947 सालात सरकारी नोकऱयांमध्ये मुसलमानांची संख्या 33 टक्के होती. आता त्या संख्येत कमालीची घट होऊन सरकारी नोकऱयांतील मुसलमानांचे प्रमाण 2-3 टक्के इतके झाले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजप आणि आरएसएस यांनी धर्माचे राजकारण चालवले आहे. देवांनाही जातीजातींमध्ये विभागण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. तसेच मुसलमानांना नमाज पठणापासून रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशाचा पुढचा पंतप्रधान कोण हे उत्तर प्रदेशच ठरवणार आहे. आमच्या राज्यात सपा-बसपा आघाडीचा दणदणीत विजय हेच माझ्यासाठी सर्वांत चांगले आणि मोठे ‘बर्थ डे गिफ्ट’ राहील.
– मायावती, अध्यक्षा, बसपा

























































