पेलेच्या विक्रमाच्या बरोबरीने ‘तो’ आनंदलाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कझान

ऑल टाइम महान फुटबॉलपटू म्हणून ज्याचे नाव आजही अबाधित आहे त्या ब्राझिलियन सुपरस्टार पेलेच्या विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या फ्रान्सचा किलियन मबापेच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. २ गोल मारून माजी विजेत्या अर्जेन्टिनाला स्पर्धेबाहेर करणाऱ्या युवा मबापेने वयाच्या एकोणिशीतच एकाच वर्ल्डकप लढतीत २ गोल मारण्याच्या पेलेच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. पेलेसारख्या महान खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचा आनंद काही औरच आहे, असे सांगून फ्रान्सचा मबापे म्हणतो, माझ्याकडून जो विक्रम घडलाय त्याच्या स्मृती माझ्या मनावर कायम कोरलेल्या असतील. कारण पेले महान खेळाडू आहे. त्याची अन माझी तुलना होणे योग्य नाही. पण त्याच्या पावलावर पाउल ठेवण्याचे भाग्य मला लाभतेय याचा आनंद मोठा आहे.

अर्जेन्टिनाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मबापेकडून फ्रान्सला उपांत्यपूर्व लढतीत मोठ्या अपेक्षा आहेत. कारण त्यांची पुढची लढत जबर फॉर्मात असलेल्या उरुग्वेशी होणार आहे. जगभरातील फुटबॉलशौकिनांच्या नजरा आता मबापेच्या उरुग्वेविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या आहेत.