
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. अंबरनाथ येथील 52 हेक्टर जागेपैकी 30 हेक्टर जागा लवकरच पालिकेला मिळू शकणार आहे. या जागेवरील आठ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी संक्रमण निवासस्थान बांधून देण्यात येणार असून त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत ही जागा पालिकेला मिळणार आहे.
मुंबईतून दररोज निर्माण होणाऱया 7200 मेट्रिक टन कचरा देवनार, मुलुंड, कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमीवर टाकण्यात येतो. मात्र या क्षेपणभूमीची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे दररोज निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी पालिकेला पर्यायी जागेची आवश्यकता होती. राज्य सरकारने सन 2015 मध्ये अंबरनाथ येथील करवले गावातील 52 हेक्टर जमीन पालिकेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 39.90 हेक्टर जमीन शासकीय असून 12.20 हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. राज्य सरकारने आपल्या मालकीच्या जागेपैकी 38.871 हेक्टर जमिनीचा ताबा सन 2016 मध्ये पालिकेला दिला. त्यापोटी पालिकेने राज्य सरकारला 10 कोटी रुपये दिले होते. या जागेपैकी पहिल्या टप्प्यात सलग 30 हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त करून कचरा व्यवस्थापनासाठी द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्ये दिले होते. त्याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली होती.
मात्र या जागेवर असलेल्या आठ प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे मुख्य सचिवांकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या प्रकल्पग्रस्तांसाठी तातडीने 500 चौ. फुटाची तात्पुरती संक्रमण निवासस्थाने बांधण्याचे ठरले आहे. त्यानुसार पालिकेने आता ही निवासस्थाने तातडीने बांधण्याचे ठरवले आहे. 31 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार असून त्यानंतर ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे पालिकेची डंपिंग ग्राऊंडची मोठी समस्याच मिटणार आहे. मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे.




























































