
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना वॉर्ड रूममध्ये रुग्णांना बेडबाबत माहिती देण्यासाठी, आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या सुमारे 100 डॉक्टर्स विद्यार्थ्यांची नेमणूक केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना आवश्यक माहिती वेळेवर मिळून गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईत प्रत्येक प्रभागातील रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात किंवा जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये वॉर्ड वॉर रूम सुरू करण्यात आले आहेत, मात्र जानेवारीअखेर कोरोना आटोक्यात आल्यामुळे या ठिकाणचे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहेत. या ठिकाणी काम करणारे मेडिकलच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थीही परीक्षेसाठी गेले होते. मात्र कोरोना पुन्हा वाढल्यामुळे या विद्यार्थ्यांना वॉर्ड वॉर रूमवर कामासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
असे होतेय काम
- रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला केवळ पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातूनच पालिका किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- कोविड रुग्णालये किंवा खासगी कोविड रुग्णालयांनीही परस्पर बेड देऊ नयेत असे आदेशच पालिका आयुक्तांनी काढले आहेत. रुग्णांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यास आवश्यकतेनुसार अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, लक्षणे नसल्यास घरी क्वारंटाइन होण्यासाठी नियम आणि खबरदारीच्या उपाययोजना सांगण्याचे कामही वॉर्ड वॉर रूममधून केले जात आहे.




























































