
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
ऐतिहासिक पाणचक्कीजवळील महेमूद दरवाजाच्या लाकडी दाराचा एक पट आज सकाळी सातच्या सुमारास कोसळला. दरवाजाचे पट कोसळल्याने या दरवाजातून होणारी वाहतूक सकाळपासून बंद पडलेली होती. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा बुडाल्या, अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला.
औरंगजेबाच्या अंतिम काळात सैबेरियातून संभाजीनगरात आलेल्या बाबा शहा मुसाफीर यांनी पाणचक्की व त्या आसपासच्या परिसरात मशीद वगैरे बांधताना या एकूणच क्षेत्रात मकाई गेटपासून बारापुल्ला गेटपर्यंत गेलेल्या तटबंदीच्या मध्येच हा दरवाजा उभारण्यात आलेला आहे. इतर दरवाजांच्या बांधकामात वापरलेले साहित्य आणि बांधकामाची पध्दत याच्याशी या दरवाजाचे साध्यम्र्य नसल्याने व घाटी दवाखाना आणि कोहिनूर कॉलनीमध्ये या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या तटबंद्या अदृश्य झालेल्या असल्यामुळे हा दरवाजा पाणचक्कीचाच दरवाजा असल्याचे कालांतराने मानले जाऊ लागले. वक्फ बोर्डाचे अधिकारीही याविषयी अचुक माहिती देऊ शकले नाहीत. मात्र तटबंदीचे सर्व दरवाजे ज्या प्रकारे बाहेरच्या बाजूने लावलेले होती व बाहेरून आत उघडत तशीच याही दरवाजांच्या पटांची रचना आहे.
मकाई गेटला ज्या प्रमाणे हत्तींचा आघात सहन करण्यासाठी लोखंडी खिळे ठोकलेले होते तसे खिळे या दरवाजाला नसले तरी लोखंडी पट्ट्या ठोकून लाकडी दरवाजा तसा मजबुत करण्यात आलेला होता. जवळपास ३०० वर्षांपासून ऊन व पावसाचा मारा सोसत तग धरलेल्या या दरवाजाचे दोन्ही लाकडी पट कुजत चालल्यामुळे स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच महेमुद दरवाजाच्या दोन्ही लाकडी पटांची उघडझाप बंद झालेली होती व दरवाजाच्या भिंतीला दोन्ही पट टेकवून ठेवलेले असल्यामुळे हा दरवाजा शहरातील इतर सर्व दरवाजाप्रमाणे २४ तास कायमस्वरूपी उघडाच असे.
महेमूद दरवाजाचे हस्तांतरण निजाम शासनाकडून केंद्र शासनाकडे केंद्राच्या आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून आता अखरीस या दरवाजाच्या संवर्धनाची जबाबदारी महानगरपालिकेच्या पुरातत्व समितीकडे आली आहे. परंतु महापालिका मात्र शहर विकासाच्या नावाखाली शहरातील खुनी गेट, नंतर खास गेट असे एकापाठोपाठ एक गेट पाडतच चाललेली आहे. सध्या वाहतुकीची कोंडी होत असलेल्या प्रत्येक दरवाजाला लागून असलेली तटबंदी तोडून पर्यायी रस्ते करण्याचे काम मनपाने हाती घेतलेले आहे. दरवाजाची देखभाल करण्याचा एक भाग म्हणून दरवाजाच्या दोन्ही बाजूला काँक्रिट पिलर उभारण्यात आले आहेत. परंतू तरीही कमानीच्या दगडांना तडे गेलेले आहेत. दरवाजाच्या भिंतीतून झाडे उगवलेली आहेत. दरवाजाचे लाकडी पट आणि दरवाजाचा आधार असलेले लाकडी खांब वर्षानुवर्षे पावसाचे पाणी पिऊन कुजलेली आहेत. मनपाचे दुर्लक्ष या घटनेला कारणीभूत आहे असा आरोप इतिहास अभ्यासक रफत कुरैशी यांनी केला आहे.
पर्यायी मार्ग काढा
जुन्या शहराच्या पश्चिमेला असलेल्या मकाई, महेमूद आणि बारापुल्ला या तिन्ही दरवाजांच्या बाहेर असलेल्या वस्त्यांना जोडणारे हे तीन दरवाजे असून, वस्त्या व लोकसंख्या प्रचंड वाढल्याने आता या तिन्ही दरवाजांमध्ये वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो आहे. लोकांचा दबाव आणि शासनाचे धोरण ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन करण्याचे असल्याने मनपाला हे दरवाजे पाडून टाकणे अवघड झालेले असल्यामुळे आता पर्यायी मार्ग म्हणून दरवाजाच्या बाजूच्या तटबंद्या फोडून स्वतंत्र रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर अधिकाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळाची पाहणी केली व दरवाजाचे संवर्धन केले जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर जेसीबी लावून पडलेले लाकडी पट उचलून बाजूला करण्यात आले आहे.




























































