राजकारण बाजूला ठेवून हिंदुस्थान-पाकिस्तानने शांततेची बोलणी करावीत! मेहबुबांना पाकप्रेमाचे उमाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या जिहादी कुरापतींनंतरही पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना सतत पाकप्रेमाचे उमाळे फुटत आहेत. पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदी मोडण्याचा विक्रम साकारत शुक्रवारी ऐन दिवाळीच्या तोंडावर गोळीबार केला आणि हिंदुस्थानी जवान व नागरिकांना लक्ष्य केले आहे.

देशभरात पाकिस्तानविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण असताना मेहबुबा यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या उभय देशांनी आपले राजकीय इगो, मजबुरी बाजूला ठेवून शांततेसाठी संवाद साधावा असे आवाहन केले आहे. एलओसीवर राहणाऱ्या उभय देशांच्या नागरिकांचे हाल मला पाहवत नाही असा राग आळवत त्यांनी हे मत मांडले आहे.

जम्मू-कश्मीरातील 370 कलम रद्द झाल्यावर गळा काढणाऱ्या मेहबुबा यांच्या वरील चर्चेच्या आवाहनाने हिंदुस्थानी नागरिकांत संताप अधिकच भडकला आहे. एरव्ही पाकधार्जिण्या धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या मेहबुबांना नक्की आमच्या दुर्दशेबाबत दुःख होतेय की पाकड्यांच्या नुकसानीने त्या अस्वस्थ आहेत असा सवाल एलओसीवर राहणारे आणि सतत पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यांना तोंड देणारे हिंदुस्थानी नागरिक विचारू लागले आहेत.

नेतृत्वाचे इगो बाजूला ठेवून उभय देशांच्या नेत्यांनी चर्चा करावी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील नेतृत्वात असलेले इगो व शत्रुत्वाची भावना विसरून उभय देशांच्या नेत्यांनी शांतता आणि मैत्रीसाठी चर्चा करावी, असे मत व्यक्त करीत मेहबुबा म्हणाल्या, हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत झालेल्या युद्धविराम समझोत्याची अंमलबजावणी झाल्यास एलओसीवर राहणाऱ्या दोन्ही देशांचे नागरिक सुखाने आणि शांततेत जगू शकतील. आता सततच्या हल्ल्यांनी त्यांच्या आयुष्यावर युद्धाची टांगती तलवार आहे. या भागातील नागरिकांचे हाल मला तरी पाहवत नाहीत.