
सामना ऑनलाईन, मुंबई
भरमसाट वीज बिले पाठवून उपनगरातील ग्राहकांची लूट करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीला गुरुवारी शिवसेनेने शॉक दिलेला असतानाच आज महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही (एमईआरसी) जबरदस्त शॉक दिला. ऑक्टोबर महिन्याचा जादा वीज वापर दाखवत व इतर आकार लावत ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठवली आहेत. त्यानुसार वसूल केलेल्या वाढीव वीज बिलाची रक्कम तब्बल साडेनऊ टक्के व्याजाने परत करा असे आदेश आज एमईआरसीने अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले आहेत. त्यामुळे ‘अडाणी’पणे केलेली वीजदरवाढ अदानीला चांगलीच भोवल्याचे दिसत आहे.
उपनगरातील ग्राहकांचा वीज वापर 15 टक्क्यांनी वाढल्याचे सांगत आणि मागील इंधन समायोजन आकाराची आकारणी करून अदानी इलेक्ट्रिसिटीने मागील महिन्यात वीज बिले पाठवली आहेत. नेहमीच्या वीज बिलाच्या तुलनेत अवाच्या सवा वीज बिले आल्याने ग्राहक रस्त्यावर उतरले आहेत. त्याची दखल घेत शिवसेनेने गुरुवारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर धडक देत वीज दरवाढ कमी न केल्यास कलेक्शन सेंटर बंद पाडण्याचा इशारा दिला होता. तसेच आज वीज आयोगाने अदानीच्या वीज दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करत ग्राहकांकडून वसूल केलेली जादाची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिले आहेत. तसेच आयोगाने दिलेल्या मंजुरीप्रमाणेच सरासरी 0.24 टक्के एवढी दरवाढ लागू करावी, जुने कोणतेही चार्जेस लावू करू नये असेही बजावले आहे. पुढील महिन्यात येणाऱ्या वीज बिलावर आयोगाची नजर असणार आहे.
द्विसदस्यीय समिती करणार दरवाढीची चौकशी
वीज नियामक आयोगाने कोणतीही वीज दरवाढ दिलेली नसताना अदानी इलेक्ट्रिसिटीने वाढीव वीज बिले दिली आहेत. याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून दरवाढीची चौकशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी अजित जैन आणि व्ही. एल. सोनावणे (वीजतज्ञ) यांची द्विसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती वाढीव वीज बिलाची चौकशी करणार आहे. तसेच गरज पडल्यास रिलायन्स एनर्जी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या बॅलन्सशीटची तपासणी करून आपला अहवाल तीन महिन्यांत आयोगाला सादर करेल, असे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही वीज वितरण कंपनीकडून असा प्रकार घडून नये म्हणून उपाय सुचवणार आहे.






























































