अंधेरी ते दहिसर मेट्रो मार्ग ७ वर दोन भव्य गर्डरचे यशस्वी लाँचिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्ग ७ वर दोन भव्य गर्डर बसविण्याचे काम रविवारी पहाटे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. प्रत्येकी १५० टन वजनाचे व २५ मीटर लांबीचे आणि ५.२५ रुंदीचे हे गर्डर प्रत्येकी ४०० आणि ३५० टन क्षमतेच्या क्रेन्सद्वारे ८ मीटर उंचीच्या खांबावर बसविण्यात आले. कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्सजवळील पीलर क्रमांक १६९ आणि १७० येथे हे गर्डर बसविण्यात आले आहेत. बोरिवली-मालाड मार्गावरील टाटा पॉवर कंपनीच्या ११० केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिन्यांच्या खाली हे काम करावयाचे असल्याने या भागातील वीजपुरवठाही काही काळ बंद ठेवणे गरजेचे होते. याकामी मुंबई महानगरपालिका, रेल्वे, पोलीस, टाटा आणि रिलायन्सचे प्रतिनिधी यांनी सहकार्य केल्याने ‘एमएमआरडीए’ने त्यांचे आभार मानले आहेत.