
सामना प्रतिनिधी, मुंबई
दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-9, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-7 प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. या प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता भासू लागली आहे. यासाठी एमएमआरडीए आपल्या विशेष अधिकाराचा वापर करणार आहे. मेट्रोच्या मार्गातील अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) विकून हा निधी उभारला जाणार आहे. यासाठी नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.
मेट्रो-9 व मेट्रो-7 हे दोन्ही प्रकल्प मार्च 2022 पर्यंत उभारले जाणार आहेत. यासाठी 6607 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी समर्पित नागरी परिवहन निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूस 500 मीटर अंतरापर्यंत येणाऱ्या जमिनीवर अधिमूल्य आकारून अतिरिक्त एफएसआयची विक्री करण्यात येणार आहे. यातील 50 टक्के रक्कम मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.

























































