खूशखबर! म्हाडा मुंबईतील एक हजार घरांसाठी लवकरच काढणार लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील घरांसाठी येत्या सहा महिन्यांत लॉटरी काढण्यात येणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुमारे एक हजार घरांचा समावेश असणार आहे.

मुंबईत जागेचे भाव वाढल्याने फ्लॅटच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा वेळी सर्वसामान्यांना परवडणाऱया किमतीत हक्काचे घर मिळवून देण्याचे काम म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची अनेकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात म्हाडाने मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज प्राप्त झाले होते. या वर्षीदेखील मुंबईतील घरांसाठी लॉटरी काढण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या लॉटरीतील काही घरे म्हाडाकडे शिल्लक आहे. त्यात आणखी काही घरांचा समावेश करून सुमारे एक हजार घरांची लॉटरी म्हाडातर्फे काढण्यात येणार आहे.

कोकण मंडळाची सोडत 24 फेब्रुवारीला

मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे रखडलेली कोकण मंडळाच्या घरांची सोडत 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाटय़गृहात काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार असून यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी कोकण मंडळाच्या अखत्यारीतील 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती. या सोडतीसाठी अनामत रकमेसह 25078 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांच्या सोयीसाठी सभागृहाच्या आवारात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबुक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विजेत्यांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी सहा वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाणार असून त्यांना एसएमएसद्वारेही कळवले जाईल.

म्हाडाच्या प्रत्येक मंडळाची वर्षातून किमान एक लॉटरी काढण्याचा आमचा मानस आहे. मुंबईत म्हाडाकडे काही शिल्लक घरे उपलब्ध आहेत. येणाऱया काळात आणखी काही घरे उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारे येत्या सहा महिन्यांत साधारण एक हजार घरांसाठी लॉटरी काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

संजीव जयस्वाल, म्हाडा उपाध्यक्ष

महारेरा संकेतस्थळाच्या वापरात सात पटीने वाढ
महारेराच्या संकेतस्थळात घर खरेदीदार, प्रवर्तक आणि एजंट्स अशा सर्व संबंधित घटकांना मदतीचे, मार्गदर्शक ठरू शकणारे बदल केले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व घटकांकडून महारेराच्या संकेतस्थळाच्या वापरात पूर्वीच्या तुलनेत सात पटीने वाढ झाली आहे. मे 2017 ला महारेरा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 39 हजार 561 जणांनी महारेराच्या संकेतस्थळाला भेट दिली. गेल्या ऑगस्टपासून भेट देणाऱयांची संख्या तब्बल 40 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे. सध्या दिवसाला 33,713 आणि तासाला 1400 जण महारेराच्या संकेतस्थळाचा वापर करीत आहेत. सहा महिन्यांपूर्वी हेच प्रमाण दिवसाला 5196 आणि तासाला 216 असे होते.