हजारो कुटुंबीयांचा जीव टांगणीला, दक्षिण मुंबईतील 178 सेस इमारती अतिधोकादायक; म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश दराडे

दक्षिण मुंबईतील 178 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हणजेच कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत. म्हाडाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.

दक्षिण मुंबईत सध्या 12 हजार 552 उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. यातील काही इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. धोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्विकास केल्यास इमारत कोसळण्याच्या घटना कमी होऊन जीवित व वित्तहानी रोखता येणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन म्हाडातर्फे सर्व उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

411 इमारतींची दुरुस्ती प्रक्रिया सुरू

स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सी-2 (अ) आणि सी-2 (ब) श्रेणीत अनुक्रमे 333 आणि 1089 इमारती आढळल्या आहेत. त्यापैकी 411 इमारतींची दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सी-3 श्रेणीत 117 इमारती असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

इमारत रिक्त करून भूसंपादन करणार

म्हाडाने आतापर्यंत 1967 उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून त्यापैकी 1717 इमारतींचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात सी-1 म्हणजेच अतिधोकादायक इमारतींची संख्या 178 आहे. या इमारतींवर कलम 88 (3) अ अन्वये कार्यवाही सुरू आहे. म्हणजेच इमारत रिक्त करून भूसंपादन केले जाणार आहे. पुनर्विकास होईपर्यंत या रहिवाशांना संक्रमण शिबिराचा किंवा दरमहा 20 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय म्हाडातर्फे दिला जाणार आहे.