स्टार वॉर मुंबई इंडियन्सने जिंकले; वानखेडेवर अर्धशतकांचा झंझावात, बुमराचा फाइव्ह स्टार भेदक मारा

>> मंगेश वरवडेकर

वानखेडेवर एकाच वेळी चार अर्धशतकांचा झंझावात क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळाला आणि ‘स्टार वॉर’च्या संघर्षात मुंबई इंडियन्सने बाजी मारताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 27 चेंडू आणि 7 विकेट राखत धुव्वा उडवला. आजच्या विजयामुळे तळाला असलेल्या मुंबईने सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

आज मुंबईकरांना षटकारबाजीसह अर्धशतकांची झंझावाती बरसातही अनुभवायला मिळाली. बंगळुरूच्या 197 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा घामटा निघणार असे वाटत होते. मात्र इशान किशनने बंगळुरूच्या गोलंदाजांची मुरली वाजवताना 23 चेंडूंत पन्नाशी साजरी करत मुंबईचा विजय निश्चित केला. नऊ षटकांतच 101 धावांची भागी सलामी दिल्यामुळे मुंबईचे काम हलके झाले होते. रोहितनेही 24 चेंडूंत 38 धावा ठोकल्या होत्या, पण त्याचा अफलातून झेल रीक टॉपलीने टिपत बंगळुरूला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला, पण दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 17 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकार खेचत घणाघाती अर्धशतक साजरे करत संघाला ‘सुपरफास्ट’ विजयही मिळवून दिला. हार्दिक पंडय़ाने 6 चेंडूंत 21 धावा चोपत मुंबईला 16 व्या षटकांत विजय मिळवून दिला.

झंझावाती अर्धशतके

आज बंगळुरूच्या डावात फाफ डय़ु प्लेसिसने 33 चेंडूंत पन्नाशी गाठली, रजत पाटीदारने 25 चेंडूंत अर्धशतक साजरे केले, तर दिनेश कार्तिकने 22 व्या चेंडूंवर वेगवान अर्धशतकाचा आनंद साजरा केला. त्यानंतर मुंबईसाठी इशानने 23 तर सूर्याने 17 चेंडूंत सामन्यातील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात आरसीबीने 11 तर मुंबईने 15 षटकार ठोकले. या खेळींमुळे आज डय़ु प्लेसिस, इशान, पाटीदार, कार्तिक आणि सूर्यकुमार यादव या पाचही जणांनी स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावण्याची करामत केली. तसेच गेल्या चार सामन्यांत 5 विकेट घेणाऱ्या बुमराने पाच विकेट घेत सूर गवसल्याचे दाखवून दिले.

तत्पूर्वी ‘स्टार वॉर’मध्ये बंगळुरूचे विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल ठार झाले असले तरी कर्णधार फाफ डय़ु प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांच्या झंझावाती अर्धशतकांनी जसप्रीत बुमराच्या घातकी मार्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 बाद 196 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.

वानखेडेवर आज जमलेल्या चाहत्यांची घोर निराशा झाली. जागतिक क्रिकेटमधील स्टार झंझावाती खेळींची ‘ईदी’ देतील अशी अपेक्षा होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कोहलीकडून आजही विराट खेळीची अपेक्षा होती, पण त्याने घोर निराशा केली. बुमराच्या अप्रतिम चेंडूने विराटला अवघ्या 3 धावांवर बाद करण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर विल जॅक्सही बाद झाल्यामुळे आरसीबीची 2 बाद 23 अशी अवस्था झाली. मात्र त्यानंतर फाफ आणि रजत पाटीदारने मुंबईच्या आक्रमणाला रोखत आणि ठोकत संघाला शतकापलीकडे नेले.

पाटीदारने 26 चेंडूंत 4 षटकार आणि 3 चौकार ठोकत 50 धावा काढल्या. त्याने डय़ु प्लेसिसह तिसर्या विकेटसाठी 82 धावांची भागी रचली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलचे वादळही घोंघावले नाही. गेल्या सहा डावांत 1, 0, 28, 3, 0, 0 त्याने केवळ 32 धावा केल्या आहेत. मग फाफने दिनेश कार्तिकसह 45 धावांची भागी रचली. पण या भागीनंतरही आरसीबी पावणेदोनशेपर्यंत मजल मारण्याची चिन्हे दिसत होती. त्यातच बुमराने सलग दोन षटकांत चार विकेट घेत बंगळुरूच्या धावांवर लगाम घातला. बुमराच्या माऱ्यामुळे आरसीबीने 18.4 षटकांत 170 धावा केल्या होत्या. पण अखेरच्या 8 चेंडूंत कार्तिकच्या फटकेबाजीने 26 धावांची लूट करत संघाला अनपेक्षितपणे 196 वर पोहोचवले. कार्तिकने  शेवटच्या तीन षटकांत तुफान फटकेबाजी करताना 4 षटकार आणि 5 चौकार लगावताना 23 चेंडूंत 53 धावा चोपल्या. बुमराने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम मारा करताना 21 धावांत 5 विकेट टिपल्या. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत दुसऱ्यांदा पाच विकेट टिपण्याचा कारनामा करून दाखवला. त्याचा हाच मारा विजयाचा शिल्पकार ठरला.