
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी पेपरफुटीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असे म्हणाले आहेत.
संजय सिंह म्हणाले की, “पेपरफुटी हा लाखो विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा मोठा विषय बनला आहे आणि सरकार या विषयावर अर्थपूर्ण चर्चा करू देत नाहीये. देशभरातील लाखो विद्यार्थी पेपरफुटीमुळे त्रस्त आहेत. तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे, परंतु भाजपचे क्रूर प्रशासन या वेदनांवर साधी चर्चाही करू देत नाहीये.”
“काल प्रयागराजच्या धाडसी विद्यार्थ्यांनी पेपरफुटीवरील चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील,” असेही ते म्हणाले. देशभरातील विविध स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
प्रयागराजमध्ये चर्चेत पोलिसांचा अडथळा
सोमवारी प्रयागराज येथे विद्यार्थ्यांसोबत पेपरफुटीबाबत सुरू असलेली आपली चर्चा रोखण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. यावरून “हुकूमशाहीने टोक गाठले आहे,” असे ते म्हणाले.
या घटनेचा व्हिडीओ शेअर करत सिंह यांनी लिहिले आहे, “यूपीच्या प्रयागराजमध्ये हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. बंद खोलीध्येही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चा करण्यास परवानगी नाकारली जात आहे. पेपरफुटीवर साधी चर्चा करण्यापासून रोखण्यासाठी प्रशासन आले आहे. मोदी-योगींचे डबल इंजिन सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांना विरोधकांना चिरडून टाकायचे आहे.”
देश भर में करोड़ों छात्र पेपर लीक से परेशान हैं।
युवा आत्म हत्या करने को मजबूर है लेकिन BJP का क्रूर प्रशासन आपके दर्द पर चर्चा की भी इजाजत नही दे रहा है।
कल प्रयागराज के बहादुर छात्रों ने पेपर लीक पर चर्चा कार्यक्रम में हिस्सा लिया आगे भी ये अभियान जारी रहेगा।#PaperLeakPMWeak pic.twitter.com/BwZQr61bVv— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 2, 2026




























































