छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना; व्हॅनचालकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविद्यालयात जाताना व्हॅनचालकाकडून होणाऱया छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या  केल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत संबंधित व्हॅनचालकावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल महादेव आव्हाड (वय 16, रा. पांगरमल, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. प्रवीण आव्हाड (रा. चिचोंडी, ता. पाथर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल हिचे चुलते नामदेव नाना आव्हाड (वय 57, रा. पांगरमल, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

स्नेहल ही पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील महाविद्यालयात अकरावीत शिक्षत होती. ती पांगरमल गावातून दररोज एका मारुती व्हॅनने महाविद्यालयात जात असे. या व्हॅनचा चालक प्रवीण आव्हाड हा गेल्या काही दिवसांपासून तिची छेडछाड करीत होता. यासह तिला फोन, मेसेज, व्हॉट्सऍप चॅटिंग, तसेच व्हिडिओ कॉल करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने रविवारी (23 रोजी) रात्री घरातील पत्र्याच्या पाइपला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजल्यानंतर नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली होती. मात्र, सोमवारी (24 रोजी) दुपारी तिच्या कुटुंबीयांना तिला वाहनचालकाने दिलेल्या त्रासाबाबत माहिती मिळाली. नंतर त्यांनी तिचा मोबाईल तपासला असता, त्यांना या गंभीर प्रकाराची आणखी माहिती मिळाली. त्यामुळे स्नेहलचे चुलते नामदेव आव्हाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आव्हाड याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी प्रवीण आव्हाड फरार झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी राहाता तालुक्यातही अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.