काळी जादू करून गर्भ पाडल्याचा संशय, बायकोच्या आत्याला ठार मारून जाळून टाकले

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पद्मजा नावाची महिला अचानक बेपत्ता झाली होती. पोलिसांना तिचा मृतदेह तेलंगाणातील नालगोंडा जिल्ह्यातील निर्जन स्थळी सापडला होता. त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह नारकेटपल्ली गावाजवळ सापडला होता. हत्या करून पद्मजा यांना जाळण्यात आले होते असे पोलीस तपासात उघड झाले होते.

31 ऑगस्टला पद्मजा बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी इनागुदुरू पोलीस ठाण्यात नोंदवली होती. 4 सप्टेंबरला नारकेटपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिक पोलिसांना सापडला होता. या महिलेचे वय 40-45 दरम्यान असावे असे स्थानिक पोलिसांनी सांगितले होते. पद्मजा यांच्या घरच्यांना जेव्हा हा मृतदेह दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी टॅटूवरून आणि पैंजणावरून तो मृतदेह पद्मजा यांचाच असल्याची ओळख पटवली होती असं मच्छलीपट्टणमचे पोलीस उपअधक्षीक मेहबूब बाशा यांनी सांगितले.

पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांना चौकशीदरम्यान हरिकृष्णा याच्यावर संशय यायला सुरुवात झाली होती. हरिकृष्णाने पद्मजा यांची पुतणी भाग्यलक्ष्मी हिच्याशी लग्न केलं होतं. पद्मजा यांना हे लग्न मान्य नव्हतं आणि त्यांनी सुरुवातीपासून याला विरोध केला होता. भाग्यलक्ष्मी ही दोनदा गरोदर राहिली होती मात्र दोन्ही वेळा तिचा गर्भपात झाला होता. पद्मजा यांनी काळी जादू केल्याने तिचा गर्भपात झाला असावा असा संशय हरिकृष्णाच्या मनात घट्टपणे रुजला होता.

पद्मजा यांच्याकडे बरंच सोनं होतं. काळी जादू केल्याच्या संशयाव्यतिरिक्त हरिकृष्णा याची या सोन्यावरही नजर होती असा पोलिसांना संशय आहे. हरिकृष्णा याने पसुवेलेती रवी कुमार, इर्रा राजेश, दासारी सिवा कृष्णा यांच्या मदतीने 31 ऑगस्ट रोजी पद्मजा यांचं अपहरण केलं होतं आणि हरिकृष्णाच्याच घरी डांबून ठेवलं होतं. हरिकृष्णाने तिच्याकडचं सगळं सोनं नाणं काढून घेतलं. पद्मजा यांनी आरडाओरडा करू नये म्हणून त्याने पद्मजा यांना गुंगीचं औषध दिलं होतं. रात्री त्याने त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. यानंतर आरोपींनी पद्मजा यांचा मृतदेह एका रिक्षातून नालगोंडामधल्या नारकेटपल्ली इथल्या स्मशानभूमीजवळ नेला आणि तिथे पेट्रोल ओतून पद्मजा यांना पेटवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या