महिला संघातील वाद वाढला, मितालीचा प्रशिक्षक पोवार यांच्यावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राजला महिलांच्या टी-20 विश्वचषकात उपांत्यफेरीच्या सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद आणखी वाढला आहे. मिताली राज हिने आता प्रशिक्षक रमेश पोवार याच्यावर गंभीर आरोप लगावला आहे. रमेश पोवार यांच्याकडून मला हिन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मिताली राजने केला आहे.

तो दिवस हिंदुस्थानचा नव्हताच , डायना एडुलजी यांचे मत

मिताली राजने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवलेल्या ईमेलद्वारे आपली बाजू मांडली आहे. ‘इंडिया टुडे’कडे या ईमेलची एक कॉपी असून या तिने रमेश पोवास यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशिक्षक पोवार यांच्यावर मितालीने भेदभावाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी अपमानित केल्याचेही मितालीने म्हटले आहे. पोवार यांच्यासह मितालीने डायना एडुलजीवरही गंभीर आरोप केले आहेत. प्रशासकीय समितीच्या सदस्य एडुलजी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे मितालीने म्हटले आहे.

काय आहे नक्की वाद?
इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात जबरदस्त फॉर्मात असलेल्या मिलाली राजला बाहेर बसवल्याचा फटका टीम इंडियाला बसला. यानंतर मितालीची मॅनेजर अनिशा गुप्ता हिने कर्णधार हरमनप्रीत कौरवर गंभीर आरोप केले. हरमनप्रीत कौरच्या कारस्थानामुळे मिताली राजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असे ती म्हणाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व मिताली राज यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी व क्रिकेट ऑपरेशन्स अधिकारी साबा करीम यांची सोमवारी भेट घेतली. दोघींनी आपली मते व्यक्त केली असल्याचे राहुल जोहरी यांनी सांगितले.