
हिंदुस्थानातील 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगाणाचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर करण्यात आले. तर, 4 डिसेंबरला मिझोरामचा स्वतंत्र निकाल जाहीर झाला. 40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट (Zoram People’s Movement ) या पक्षाने मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) पक्षाचा पाडाव करत सत्ता काबीज केली आहे. या निकालानंर 32 वर्षांच्या बरील वन्नाईसांगी प्रकाशझोतात आल्या आहेत.
झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) पक्षाच्या तरुण महिला उमेदवार बरील वन्नाईसांगी या मिझोरामच्या निवडणुकीत लक्षवेधी चेहरा ठरल्या असं म्हणावे लागेल. आयझॉल दक्षिण-3 मतदार संघातून त्यांनी मिझो नॅशनल फ्रंटचे (MNF) उमेदवार एफ लालनुनमाविया यांचा पराभव करत 9,370 मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे सर्वात तरुण महिला आमदार होण्याचा बहुमान बरील वन्नाईसांगी यांनी मिळवला.
40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत झोराम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) ने 27 जागा जिंकत मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) धूळ चारली. झोरमथांग यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या MNF ला केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला. भाजपने इथे 23 जागा लढवल्या होत्या मात्र त्यांना 2 जागांवरच विजय मिळाला. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.
कोण आहेत बरील वन्नाईसांगी (Baryl Vanneihsangi)
32 वर्षीय बरील वन्नाईसांगी या मिझोराम विधानसभेतील सर्वात तरुण महिला आमदार ठरल्या आहेत. कला शाखेत मास्टर्स केल्यानंतर बरील यांनी न्यूज अँकर म्हणुन आपल्या करीयरला सुरुवात केली. तसेच, सोशल मिडीयावर सुध्दा त्यांचा मोठा चाहता वर्ग असून इन्स्टाग्रामवर त्यांचे 2 लाख 51 हजार फॉलोअर्स आहेत. बरील यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत.
मिझोरामच्या विधानसभेत पहिल्यांदाच घुमणार महिला आमदारांचा आवाज
मिझोरामच्या विधानसभेत आतापर्यंत एकही महिला आमदार नव्हती. यावेळी एक-दोन नव्हे तर, तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) पक्षाच्या बरील व्हॅनीहसांगी या आयझॉल दक्षिण-3 मतदारसंघातून तर लालरिनपुई या लुंगलेई पुर्व मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर, मिझो नॅशनल फ्रंटच्या (MNF) प्रोवा चकमा यांनीही विजय मिळवलाय.



























































