कुडाळ बसस्थानकाचे तात्काळ काम सुरू करा – आ.वैभव नाईक

काशिराम गायकवाड । कुडाळ

कुडाळ गांधीचौक येथील जुने बसस्थानक पाडून नवीन अद्ययावत बसस्थानक बांधण्यात येणार आहे. जुन्या बसस्थानकाचा भाग पाडण्याचे सुरू झालेले काम एस.टी.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्ध्यावर थांबले होते. मंगळवारी आ. वैभव नाईक यांनी या बसस्थानकाची पाहणी करत नवीन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करावे. उद्या बुधवारपासून प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली पाहीजे. या कामात कोणाचीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा एस.टी. प्रशासनाला दिला.

कुडाळ येथील सुसज्ज अशा बसस्थानकासाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मार्च महिन्यात या बसस्थानक बांधकामाचा शुभारंभही झाला. या नवीन बसस्थानकासाठी जुन्या बसस्थानकाची ईमारत पाडण्याचे काम महीन्याभरापूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र एस.टी. प्रशासनाने तेथील आरक्षण केंद्र पर्यायी जागेत हलविण्यात दिरंगाई केल्याने सुरू झालेले काम अर्ध्यावर ठेवण्याची वेळ ठेकेदारावर आली. याची दखल घेत आ.नाईक यांनी मंगळवारी तातडीने बसस्थानकाची पाहणी करीत आरक्षण केंद्र पर्यायी जागेत न हलविल्याने काम बंद पडल्याबाबत एस.टी. प्रशासनाला खडे बोल सुनावले.

कोणत्याही परिस्थितीत उद्या बुधवारपासून काम सुरू झाले पाहीजे, कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आ. नाईक यांनी यावेळी संबंधितांना दिला. आरक्षण केंद्राची पर्यायी जागेत व्यवस्था करून पासधारक व आरक्षणासाठी येणा-या प्रवाशांची गैरसोय होऊ देऊ नये, बसस्थानकामागे असलेले शौचालय नवीन बसस्थानक बांधकामात पाडले जाणार असल्याने बसस्थानक आवारात शौचालयाची पर्यायी व्यवस्था करावी तसेच प्रवाशांची सुरक्षा व वेळेत प्रवासी वाहतुक व्यवस्था याकडेही लक्ष द्यावे अशा सुचना आ. नाईक यांनी यावेळी एस.टी.प्रशासनाला दिल्या. एस. टी.प्रशासनाच्या अभियंत्यांनी तात्काळ कामाचे लाईन आऊट देऊन काम युध्दपातळीवर सुरू करावे, अशा सुचना आ. नाईक यांनी एस.टी.चे बांधकाम विभागाचे अभियंता बिले यांना दिल्या. शौचालयाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रवाशी व नागरिकांनी अनंत मुक्ताई जवळील सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आगार व्यवस्थापक सुजीत डोंगरे यांच्याकडून प्रवासी वाहतूक व्यवस्था व अन्य सोयींबाबत आ. नाईक यांनी माहीती घेतली. सभापती राजन जाधव, पं.स.सदस्य डॉ. सुबोध माधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुशील चिंदरकर आदींसह एस.टी.चे पी.एन.ठाकुर, ठेकेदार प्रतिनिधी अणावकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अर्धे बसस्थानक राहणार सुरू
नवीन बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असताना जुने बसस्थानकाचा अर्धा भाग प्रवासी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. जुन्या बसस्थानकाचा मागील भाग पुर्णतः पाडून त्या बाजूने नवीन बसस्थानक इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील भाग पाडला जाणार आहे. त्यामुळे तुर्तास समोरील दोन्ही फलाट प्रवासी वाहतूक खुले असणार आहेत. पास व तिकिट आरक्षण केंद्र जुन्या बसस्थानकात कंट्रोल केबीनमध्ये सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आगारव्यवस्थापक सुजीत डोंगरे यांनी यावेळी दिली.

न.पं.कडून जागा देण्यास दिरंगाई
जुने बसस्थानक पाडताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अनंत मुक्ताई जवळील न.पं.च्या जागेत टचिंग पॉईंटद्वारे पर्यायी बसस्थानकाची व्यवस्था करण्यासाठी एस. टी. प्रशासनाने कुडाळ नगरपंचायतीकडे त्या जागेची मागणी केली होती. मात्र न. पं. ने जागा देण्याची अद्याप कार्यवाही केली नसल्याने एस.टी.प्रशासनाने अनंत मुक्ताई जवळ बसथांबा ठेवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या