कुटुंबाचं बजेट ‘मोदी’त निघालं, ‘जीएसटी’त मोठी वाढ होणार

984

मंदीच्या फेऱयात अडकलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. मात्र, महसूल वाढविण्यासाठी केंद्र सरकार आता जनतेवरच बोजा टाकणार आहे. लवकरच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) स्लॅबमध्ये बदल केले जाणार आहे. 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये वाढ करून 6 टक्के ते 10 टक्क्यांवर केला जाण्याची शक्यता आहे. 12 टक्क्यांचा स्लॅबच बंद करून त्यातील सर्व वस्तूंवर 18 टक्के जीएसटी वसूल केला जाणार आहे. त्यामुळे याचा थेट फटका कोटय़वधी जनतेला बसणार असून, रोजच्या ताटात महागाईचा घास असणार आहे. यामुळे कुटुंबांचे बजेट ‘मोदी’त निघणार आहे.

जीएसटी लागू करताना राज्यांना दरमहा भरपाई देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. करसंकलन कमी होत असल्याने राज्यांना यावर्षी दरमहा सुमारे 13750 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. पुढीलवर्षी जर जीएसटीतून मिळणारा महसूल 14 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास भरपाईची रक्कम सुमारे 20 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. दरम्यान, पंजाबसह काही राज्यांना काही महिन्यांपासून केंद्र सरकारने भरपाईची रक्कमही दिलेली नाही.

काय महागणार?
– 5 टक्के जीएसटीमध्ये ब्रँडेड तृणधान्यांमध्ये तांदूळ, मका, बाजरी, नाचणी, पोहे, ज्वारी, जवस महागणार आहे. अगरबत्ती, फ्रोझन फूड, चहा, मसाले, कॉफी, सुका मेवा, पिझ्झा, ब्रेड, पामतेल, ऑलिव ऑईल, केटरींग, लिनन कपडे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज, एसी रेल्वे प्रवास, क्रुझ प्रवास, टूर सव्हिस अशा तब्बल 288 वस्तू महागणार आहेत.

– 12 टक्के स्लॅब रद्द करून 18 टक्के केल्यास बटर, मोबाईल, रेस्टॉरंटमधील सॉफ्ट ड्रिंक्स, हॉटेलमध्ये राहाणे, बिजनेस क्लास विमान प्रवास, लॉटरी, पेंटींग, चिटफंड सेवा, चीज, इन्स्टंट फूड, मिक्स टुथ पावडर.

1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी प्रणाली लागू झाली; पण जीएसटी लागू करताना अनेक त्रुटी राहिल्या. घाईघाईत अंमलबजावणी केल्यामुळे सरकारचा वार्षिक महसूल सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान, ही महसूल घट वाढून 2.50 लाख कोटींपर्यंत जाऊ शकते, असे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक मंदी, कमी जीएसटी संकलन, वाढती महसुली तूट याचा फटका आता जनतेला बसणार आहे.

रुग्णालयातील उपचार, हॉटेलमध्ये राहणे महागणार
खासगी महागडे रुग्णालये, एक हजार रुपयांपेक्षा कमी दर असणाऱया हॉटेल्सच्या बिलावरही जीएसटी लागू केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारला प्रतिवर्षी एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. सध्या या दोन्ही सेवा जीएसटी कक्षेबाहेर आहेत.

5 टक्के स्लॅब 6 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढविणार
12 टक्क्यांचा स्लॅब बंद करून 18 टक्के करणार
531 वस्तूंची दरवाढ होणार
– 5 टक्के जीएसटी -288 वस्तू.
– 12 टक्के जीएसटी -243 वस्तू.
– 18 टक्के जीएसटी – 631 वस्तू
– 28 टक्के जीएसटी 29 वस्तूंवर आहे.
– 5 टक्के जीएसटी वाढवून 6 टक्के किंवा 9 ते 10 टक्क्यांपर्यंत केला जाण्याची शक्यता आहे. तसेच 12 टक्के जीएसटीचा स्लॅब रद्द करून 18 टक्के होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही मिळून तब्बल 531 खाद्य आणि इतर वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

काय महाग होणार

तांदूळ, मका, बाजरी, नाचणी, पोहे, ज्वारी, जवस

अगरबत्ती, फ्रोझन फूड,

चहा, मसाले, कॉफी, सुका मेवा, पिझा, ब्रेड, पामतेल

हॉटेलमधील जेवण, लिनन कपडे, ब्रँडेड कपडे,

ब्रँडेड शूज, एसी रेल्वे प्रवास

1 लाख कोटींचा जादा महसूल मिळेल
‘जीएसटीतील या बदलांमुळे सरकारला प्रतिवर्षी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा जादा महसूल मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. त्यावेळी या बदलाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आयकर कपात करण्याचा विचार
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहेत. पर्सनल आयकरामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. देशात आर्थिक मंदी असून, जीडीपी अवघा 4.5 टक्क्यांवर आला आहे. यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, कॉर्पोरेट टॅक्स 10 टक्क्यांनी कमी केला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या दोन महिन्यांत 5 लाख कोटींचे कर्जवाटप केले आहे. पर्सनल आयकर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या