
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधला. चौकीदार चोर आहे असे सांगून काँग्रेस तुमची प्रतिमा मलीन करत आहे असे मोदींनी चौकीदारांना उद्देशून म्हटले. तसेच प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात चौकीदार जिवंत राहिला पाहिजे असेही मोदींनी यावेळी म्हटले.
काँग्रेसला धारेवर मोदी म्हणाले की “नामदार लोक ‘कामदारां’प्रति घृणा निर्माण करत आहेत. तसेच चौकीदारांच्या माध्यमातून माझ्यावर वैयक्तिक हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टी.व्ही, सोशल मीडियावर चौकीदाराचीच चर्चा आहे. आज प्रत्येक हिंदुस्थानी म्हणतोय की मी ही चौकीदार. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चौकीदाराच्या विरोधात एक अपमानास्पद अभियान सुरु केले होते. यासाठी मी तुमची माफी मागतो.” तसेच त्यांनी वापरलेल्या भाषामुळे तुम्हाला त्रास झाला हे चुकीचे असल्याचेही मोदींना सांगितले.



























































