
आजवर माकडांच्या अनेक करामती आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओत माकड चक्क स्वतःच्या मेंदूचा वापर करून कॉम्प्युटरवर व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ बनावट वाटत असला तरी हे खरं आहे. टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने माकडाच्या मेंदूत बसवलेल्या न्युरालिंक चीपमुळे हे शक्य झाले आहे.
एलन मस्क यांची कंपनी सध्या मानवी मेंदूत बसवली जाईल अशा चीपची निर्मिती करतेय. यामुळे कॉम्प्युटर आणि मानवाचे मेंदू एकमेकांशी जोडले जातील आणि मानवी मेंदूच्या विकासासाठी नवनवीन माहिती मिळू शकेल. याच प्रयोगाचा भाग म्हणून नऊ वर्षांच्या पेजर नावाच्या माकडाच्या मेंदूत कॉम्प्युटर चीप बसविण्यात आली आहे. नुकताच एलन मस्क यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात माकड स्वतःचा मेंदू वापरून पाँग गेम खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कंपनीने दोन व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. पहिल्या व्हिडीओत पेजर स्वतःचा मेंदू वापरून जॉयस्टिकचा वापर करून व्हिडीओ गेम खेळताना दिसतोय. तर दुसऱया व्हिडीओत कॉम्पुटरशी कनेक्ट असलेली जॉयस्टिक हटवण्यात आली आहे. त्यानंतर जॉयस्टिक शिवायदेखील वायरलेस कनेक्शनच्या मदतीने तो गेम खेळताना दिसतोय.




























































