आठवडाभरात मोनोरेलला लाभले 1.98 लाख प्रवासी, एकूण 36 लाख रुपयांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दर दिवसाला एक लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचा दावा करणाऱ्या मोनोरेलने आठवडाभरात 1.98 लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. तर 36 लाख रुपयांची कमाई या आठवडाभरात झाली आहे. मोनोरेलचा चेंबूर ते संत गाडगे महाराज हा संपूर्ण पट्टा प्रवाशांसाठी 4 मार्चपासून सुरू झाल्याने हळूहळू प्रवाशांची वाढ होत आहे.

मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा 8.93 कि.मी.चा पट्टा हा जनतेसाठी 2 फेब्रुवारी 2014 पासून सुरू करण्यात आला होता. वडाळा ते सातरस्ता हा 10.24 कि.मी.चा दुसरा टप्पा सोमवार 4 मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. असा एकूण 19.17 कि.मी.चा संपूर्ण टप्पा कार्यरत झाल्याने मोनोरेलला दर दिवसाला एक लाख प्रवासी लाभतील असा दावा केला जात होता. परंतु मोनोरेलच्या केवळ चारच गाडय़ा कार्यरत असल्याने दर 22 मिनिटांना एक मोनोरेल चालविण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगात एक गाडी गेल्यानंतर 22 मिनिटे थांबण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याचे म्हटले जात आहे. मोनोरेलच्या सतरा स्थानकांवरील प्रवासी संख्या आणि तिकीट विक्रीनुसार पहिल्या आठ दिवसांत एकूण 1 लाख 98 हजार 525 प्रवाशांच्याद्वारे एकूण 36 लाख 8 हजार 662 रूपयांची कमाई मोनोरेलला झाली असल्याची माहिती एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे.