
सामना ऑनलाईन, पंढरपूर
श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आषाढवारीमध्ये राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणत भाविक येत असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी २१ ते २८ जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे ८ हजार कर्मचारी सेवा देणार असून, या कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळामार्फत नियोजनाबाबतच्या आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे, एस.टी प्रांतधिकारी सचिन ढोले. सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील, महाव्यवस्थापक यांत्रिकी श्री. पावणीकर, उपमहाव्यस्थापक वाहुकचे श्री.तोरो, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,श्रीमती अर्चना गायकवाड, श्री.आजरे, विभाग नियंत्रक-रमाकांत गायकवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





























































