
मुंबईवरील 93च्या साखळी बॉम्बस्पह्टातील मोस्ट वॉण्टेड दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) अटक करण्यात आली आहे. बकरचा शोध घेण्यासाठी हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी अनेक देशांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू ठेवले होते. तब्बल 29 वर्षांनंतर तपास यंत्रणांनी बकरला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा हादरा बसला आहे.
1993च्या बॉम्बस्फोटाचा कट आखण्यात बकरने दाऊदला साथ दिली होती. हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी बकरविरुद्ध 1997 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. यापूर्वी 2019 मध्येही बकरला अटक करण्यात आली होती. काही कागदपत्रांतील त्रुटीमुळे त्यावेळी त्याची सुटका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थानी तपास यंत्रणा आता बकरच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला गती देऊन लवकरच हिंदुस्थानात आणणार आहेत. त्याच्या चौकशीतून 93च्या बॉम्बस्पह्टामागील नवे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
























































