ठाणेकरांना उपचार मिळणार ‘सुपरफास्ट’, आरोग्य सेवेत मोटर बाईक अॅम्ब्युलन्स दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । ठाणे

वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचता येत नाही…. अनेकवेळा वेळेत उपचार न मिळाल्याने एखादा अपघातग्रस्त व्यक्ती दगावतो… यावर मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपल्या ताफ्यात अॅम्ब्युलन्स बाईक दाखल केले असून आजपासून ते ठाणेकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहेत. अत्याधुनिक साधनसामग्रीने सज्ज अशा या मोटर बाईक अॅम्ब्युलन्स असून प्रशिक्षित पॅरामॅडिक डॉक्टर त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता सुपरफास्ट आरोग्यसेवा व उपचार मिळणार आहेत.

ठाण्यातील रस्ते रुंद झाले असले तरी वाहतूक काsंडीची समस्या अद्यापि कायम आहे. याशिवाय रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशावेळी घटनास्थळी अॅम्ब्युलन्स पोहचेपर्यंत जखमी व्यक्ती उपचाराअभावी दगावत असल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच हृदयविकाराचा झटका, आगीत होरपळलेल्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जातो. यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात मोटर बाईक अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 12 मोटर बाईक अॅम्ब्युलन्स ठाणेकरांच्या आरोग्यसेवेत दाखल झाली आहेत. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पालिका मुख्यालयात मोटर अॅम्ब्युलन्सला झेंडा दाखवून त्याचे लोकार्पण केले. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, गटनेते दिलीप बारटक्के, महिला व बालकल्याण सभापती राधिका फाटक, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका पल्लवी कदम, भुषण भोईर, आयुक्त संजीव जयस्वाल, आरोग्य अधिकारी आर. टी. पेंद्रे, महेश राजदेरकर, शाखाप्रमुख सतीश पवार उपस्थित होते.

अर्ध्या तासात उपचार
हृदयविकाराचा झटका, रक्तदाब वाढणे आदी वेळी रुग्णाला पहिल्या अर्ध्या तासात वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. त्यादृष्टीने या बाईक अॅम्ब्युलन्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

फस्टएड बॉक्स ते ट्रामा किट
आपत्कालीन परिस्थितीत उपचाराची साधनं, एअर-वे किट- ज्यात साधं ऑक्सिजन मास्क आणि इतर गोष्टी असतील हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ देण्यात येणारी औषधं. भाजल्याचे व्रण असल्यास बर्न-स्प्रे इंजेक्शन आणि प्राथमिक उपचारांसाठी गोळ्या. आग विझवण्याचं छोटं उपकरणं आणि ट्रॉमा किट अशी अत्याधुनिक साधनांनी ही मोटर बाईक अॅम्ब्युलन्स सज्ज आहे.