
कोकणातील निसर्गसंपन्न समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांचा चित्रपट निर्मितीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे ‘फिल्म टुरिझम’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालशेत येथील सुमारे 125 एकर शासकीय जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभारण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिले. प्रकल्पासाठी निधीचे विविध पर्याय तपासून महिनाभरात प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले.
आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म टुरिझम प्रकल्पाच्या नियोजनासाठी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्पृतिक कार्य विभागाचे सचिव किरण पुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे चित्रीकरणासाठी अनुपूल असून, या परिसरात यापूर्वी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत मिळण्यात अडचणी येत असल्याने चित्रपट निर्मात्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निधीसाठी म्हाडाची घेणार मदत
पालशेत येथील सुमारे 125 एकर जागेवर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला पूरक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला आला. या ठिकाणी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुविधा उभारण्यासह एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत विचार करण्यात आला. त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हाडाची मदत घेण्याची शक्यताही तपासण्यात येणार आहे.
























































