IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा एकत्रित पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठींबा दर्शवला होता. आता याबाबत निर्णय घेण्यात आला असून MPSC ची परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने या पार्श्वभूमीवर गुरुवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, अशी माहिती राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
हा निर्णय अर्धवट
MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित 258 जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे. जागा रिक्त असून आजच combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.