
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत सातवा क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य सहा आरोपींना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
एमपीएससीचा औषध निरीक्षक (गट-ब) चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने यापूर्वी सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एमपीएससीचे तीन अधिकारीही आहेत. अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये एमपीएससीचे सहाय्यक विभाग अधिकारी विश्वेश्वर नकाटे आणि गोपाल मराठे, एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे; नंदुरबार येथील काwटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील आणि कथित सह-आरोपी अमृत पाटील व लोकेश ऊर्फ गौरव पाटील यांचा समावेश आहे. या प्रकरणात नव्याने अटक करण्यात आलेल्या ऋतुजा पाटील हिला व अन्य आरोपींना सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. अतिरिक्त न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी तपास यंत्रणेने युक्तिवाद करताना सांगितले की, पाटील हिला परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाली होती.



























































