अँटालिया स्फोटके प्रकरणी अनेक बाबी अनुत्तरीत, उच्च न्यायालयाने NIA ला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांसोबत इतर कोण अँटालिया स्फोटके प्रकरणात सामील होते याबाबत NIA ने अद्याप माहिती न देणं हे एक कोडं असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला, त्यावेळी न्यायालयाने हे विधान केले आहे. उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने म्हटले की प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांनी मिळून कट रचला होता. यावर न्यायालयाने म्हटले की ही बाब आरोपपत्रात नमूद नाहीये. हीच बाब गोंधळात टाकणारी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की आरोपपत्रानुसार प्रदीप शर्मा याचा मनसुख हिरेन याच्या हत्येत हात असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे, त्याचा स्फोटके पेरण्यात हात असल्याचे म्हटलेले नाही.

उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “सचिन वाझे हा एकटा हे कृत्य करू शकत नाही . कटाच्या आरोपासाठी त्यात 2-3 जणांचा सहभाग असणं गरजेचं असतं. अँटालियाबाहेर स्फोटके असलेली गाडी आणून उभी करणे या घटनेसंदर्भात अनेक प्रश्न उभे राहात असून त्यातील काही बाबी या अद्यापही अनुत्तरीत आहेत. न्यायालयाने असेही म्हटले की सचिन वाझे याला कोणाची तरी मदत मिळाल्याशिवाय किंवा कोणाच्या तरी सूचना मिळाल्याशिवाय हे कृत्य करू शकत नाही. “