मुंबईतील 306 सहकारी संस्थांना कायमचे लागणार टाळे

बापू सुळे

मुंबईतील बंद आणि पत्त्यावर न आढळणाऱ्या सहकारी संस्था सहकार विभागाच्या रडारवर आल्या आहेत. त्यानुसार ज्या संस्थांचा कारभार बंद आहे, लेखा परीक्षण केले जात नाही, नोंदणीकृत पत्त्यांवर आढळत नाहीत, अशा तब्बल 306 संस्थांना कायमस्वरूपी टाळे लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून संबंधित संस्थांना अवसायनाच्या अंतरिम नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे कागदोपत्री सहकारी संस्था चालवणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत.

मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्था वगळता पतसंस्था, मजूर संस्था, पगारदार संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्थांची संख्या 2122 नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत, मात्र त्यापैकी अनेक संस्थांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री असून त्यांचा प्रत्यक्ष कारभार चालत नाही, लेखा परीक्षण केले जात नाही तसेच अनेक संस्था नोंदणीकृत पत्त्यावर नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत कागदावरील सहकारी संस्थांचा शोध घेण्यासाठी सर्वच संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला होता. त्यानुसार 2122 पैकी ज्या संस्थांचा लेखा परीक्षण अहवाल सहकार विभागाकडे सादर केले जात नाहीत अशा 1448 पैकी 670 संस्थांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यापैकी 306 संस्था केवळ कागदावर चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 154 संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायनाची अंतरिम नोटीस पाठवल्या आहेत, तर दोन संस्थांचे अवसायनाचे आदेश काढले आहेत.

एका महिन्यात बाजू मांडावी लागणार

ज्या संस्थांना सहकार विभागाने अवसायनाची नोटीस पाठवली आहे, त्यांना आपली बाजू एका महिन्यात लेखी स्वरूपात उपनिबंधकांकडे मांडावी लागणार आहे. जर संबंधित संस्थेने आपली बाजू न मांडल्यास सदर संस्थेचे कामकाज अधिकृतपणे बंद असल्याचे समजून नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहकार विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

अवसायनाची नोटीस दिलेल्या संस्था

डीडीआर 1     163

डीडीआर 2     0

डीडीआर 3     91

डीडीआर 4     51