पॅरोलवरचा फरारी आरोपी पुण्यात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हत्येच्या गुह्यात जन्मठेपेची शिक्षा लागल्यानंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना 14 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने शोधून आणला. नाव व ओळख बदलून तो पुण्यात लपून राहत होता.

बाळू चव्हाण (37) असे त्याचे नाव आहे. त्याने त्याच्या अन्य साथीदारांसह 2011 मध्ये मुलुंड परिसरात आकाश कांबळे या तरुणाची हत्या केली होती. या गुह्यात बाळू व त्याच्या तिघा साथीदारांना अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. 2014 मध्ये 14 दिवसांच्या पॅरोलवर बाळू बाहेर आला व त्यानंतर तो पुन्हा कारागृहात गेलाच नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात 244 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान युनिट-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटणकर, उपनिरीक्षक लोहकरे, अंमलदार मोरे, पांडे, चिले या पथकाने बाळूचा शोध सुरू केला तेव्हा बाळू पुण्यात हीना नावाच्या महिलेसोबत लग्न करून दोन मुलांसह ओळख लपवून रवी जगताप या नावाने राहत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे गाठून बाळूला पकडले व पुढील कारवाईसाठी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले.