
आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे व जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल. त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटीमध्ये व्यापक आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. पण मराठा आंदोलक मुंबईत पुन्हा येऊन थडकण्याची भीती राज्य सरकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने तातडीने अधिसूचना जारी करून आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भागात आंदोलनाला बंदी घातली आहे.
आंदोलनासाठी सीमा निश्चित
गृह विभागाने कोणत्याही आंदोलनासाठी आझाद मैदान (मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या समोरील भाग) हे एकमेव अधिकृत ठिकाण घोषित केले आहे. आंदोलकांना मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग व मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र अशी सीमा आखून देण्यात आली आहे.
आंदोलनासाठी अन्य अटी
- मोर्चे व बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी.
- पाच हजार आंदोलकांनाच परवानगी.
- आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावे आणि तिथूनच पांगावे.
- ट्रक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहने व प्राणी आणण्यास बंदी.
- पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही.
- नऊ बाय सहा फुटांपेक्षा मोठा बॅनर, झेंडा नको.
- झेंड्याची काठी दोन फुटांपेक्षा मोठी नको.
- तंबू-मंडप उभारण्यास बंदी.
- लाठय़ा, तलवारी, भाले बाळगण्यास बंदी.
- आत्मदहन, आमरण उपोषणावर बंदी.
- पुतळे, कागदपत्रे, पुस्तके जाळण्यास मनाई.
- रस्ते किंवा फूटपाथ अडवण्यास बंदी.
शासकीय कामकाजाच्या दिवशीच मुभा
आंदोलनाला शासकीय कामकाजाच्या दिवशीच मुभा देण्यात आली आहे. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाही. आंदोलन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेतच करता येईल. संध्याकाळी सहानंतर आझाद मैदान पूर्णपणे रिकामे करावे लागेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

























































