
सामना प्रतिनिधी। मुंबई
भायखळा कारागृहातील कैद्यांकरिता दहा दिवसांचा विपश्यना उपक्रम राबवला जाणार आहे. विपश्यनेकरिता आतापर्यंत 20 महिला कैद्यांनी होकार दर्शवला आहे. या उपक्रमामुळे कैद्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल.
तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत येत असलेले दक्षिण मुंबईमधील भायखळा जेल हे महत्त्वाचे मानले जाते. महिला आणि पुरुष असे मिळून साधारण 350 हून अधिक कैदी सध्या तेथे आहेत. किरकोळ गुह्यातील कैद्यांची संख्या अधिक आहे. कित्येकदा काही कारणात्सव नातेवाईक हे कैद्यांना भेटण्यास येत नाहीत. त्यामुळे कैदी निराश होतात. निराश झाल्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात. गेल्या काही वर्षांत कैद्यांनी तुरुंगात आत्महत्या केल्याचा घटना घडल्या होत्या. त्याची दाखल घेत तुरुंग प्रशासनाने ऑपेरेशन ट्रकिंग हा उपक्रम सुरू केला. त्यानुसार मानसिक तणावात असलेल्या कैद्यांना शोधून काढले. त्यांना समुपदेशनापासून ते मानसिक तणाव कसा दूर करावा याबाबत मार्गदर्शन केले.
नैराश्य आणि मानसिक तणाव दूर करण्याकरिता तुरुंग प्रशासनाने विपश्यना हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
एका खासगी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम तेथे राबवला जाणार आहे. उपक्रमाची तारीख अंतिम टप्यात असून मार्चच्या तिसऱया आठवडय़ात हा उपक्रम राबवला जाण्याची शक्यता आहे. 10 दिवसांच्या विपश्यना उपक्रमाकरता 20 महिला कैद्यांनी होकार दर्शवला असल्याचे तुरुंग अधिकारी अरुणा मुरगुटराव यांनी सांगितले. विपश्यनेकरिता संपूर्ण दिवस जाणार आहे. त्यामुळे ज्या कैद्यांना त्या काळात न्यायालयात तारखेला हजर कसे करायचे, तेदेखील तपासले जाणार आहे. त्यानंतर विपश्यनेकरिता कैद्याची निवड केली जाणार आहे.


























































