‘म्हाडा’ वसाहतींमध्येही नगरसेवक निधी वापरणार

सामना प्रतिनिधी। मुंबई

म्हाडा’, पोलीस, बीपीटीसारख्या वसाहतींमध्येही आता नगरसेवक निधी वापरला जाणारा आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. यामुळे नगरसेवक निधीच्या वापराची मर्यादा आणखी वाढणार असून निधी ल्याप्स होण्याचे प्रमाण थांबणार आहे.

म्हाडा, बीपीटी, पोलीस यांच्या अनेक वसाहती आहेत. या प्राधिकरणांमध्ये सहकारी सोसायटय़ा असो किंवा इतर कोणत्याही इमारती असल्या तरी मालमत्ता करापासून इतर कर भरूनसुद्धा त्या वसाहतीना आणि तेथील रहिवाशांना नगरसेवक निधीचा फायदा मिळत नाही. मात्र या करदात्यांच्या पैशातून झोपडपट्टीसह इतर ठिकाणी पालिकेकडून सुविधा पुरवल्या जात होत्या. गल्ल्या सुधारणे, पाणीपुरवठा करणे आणि शौचालयांची दुरुस्ती करणे अशा नगरसेवकांच्या कामांना मर्यादा पडत होत्या. त्यामुळे अनेक नगरसेवकांचा निधी एकतर पडून राहत होता तर अनेकांचा निधी काही अंशी खर्च होत होता. इच्छा असूनही नगरसेवकांना कामे करता येत नव्हती. मात्र आता म्हाडा वसाहती, पोलीस वसाहती आणि बीपीटी वसाहतींमधून नगरसेवकांना काम करण्याची सुसंधी मिळणार असल्यामुळे त्यांचा निधी शंभर टक्के खर्च होणार आहे.