
कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वडाळा येथील एका बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने कारवाई केली. कॉल सेंटर थाटून सुमारे दोन ते तीन हजार लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून या भामटय़ांनी त्यांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी 11 जणांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
काही व्यक्ती कोणतेही परवाने न घेता वडाळा येथे बोगस कॉल सेंटर चालवित असल्याची माहिती युनिट-3 ला मिळाली होती. बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक व शासनाचा कर चुकविणाऱ्या त्या कॉल सेंटरचा झोल स्पष्ट होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3 चे प्रभारी निरीक्षक सोपान काकड, निरीक्षक शामराव पाटील, सपोनि समीर मुजावर, सोनाली भरते व पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे काम करणारे 11 तरुण युके व हिंदुस्थानातील नागरिकांना झोईपर सॉफ्टवेअरद्वारे कॉल करून हिंदुस्थानी नागरिकांना पाच ते दहा हजार आणि यूकेतील नागरिकांना 500 ते एक हजार रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली व्रेडिट करायला सांगत होते. मग ते मिळालेले पैसे परत न करता फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या सर्वांना अटक करण्यात आली. त्या ठिकाणाहून 14 लॅपटॉप, एक डेस्कटॉप, 11 हेडपह्न, 12 मोबाईल, दोन राऊटर, लॅन मशीन असे साहित्य हस्तगत करण्यात आले.
ट्रेड ग्लोबर मार्पेट डॉट कॉम या कंपनीच्या वेबसाईटवरून फॉरेक्स शेअर्स करन्सी व कमोडिटीबाबत सांगितले जायचे. कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी बतावणी करीत नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले जायचे. पैसे मिळाले की ते नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे द्यायचे असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

























































