बँकांना अग्निसुरक्षेचे नियम लागू होत नाहीत

26

सामना प्रतिनिधी। मुंबई

बँकेला आग लागून एखादी दुर्घटना घडू नये म्हणून बँकांमध्येही अग्निसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. बँकांना अग्निसुरक्षेचे नियम लागू होत नाहीत असे स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाने बँकांच्या अग्निसुरक्षेसंदर्भातील याचिका फेटाळून लावली.

राज्यात सुमारे 13,500 बँका व त्यांच्या शाखा असून या बँकांमध्ये सुमारे दीड लाख कर्मचारी काम करतात. आग लागून एखादी दुर्घटना घडू नये यासाठी बँकांनाही अग्निसुरक्षेच्या नियमावलीची अंमलबजावणी आवश्यक आहे, परंतु सहकारी, राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत किंबहुना अग्निशमन विभागाकडून त्यासंदर्भातील एनओसीसुद्धा घेतली जात नाही असा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते सपन श्रीवास्तव यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिझर्व्ह बँकेसह इतर बँकांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

कायद्याचे उल्लंघन
महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायदा 2006 ची अंमलबजावणी बँकेमार्फत होणे गरजेचे असतानाही बँकांकडून मात्र त्याचे उल्लंघन केले जाते. या कायद्याकडे दुर्लक्ष म्हणजे लॉकर्सच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या नियमाचेही उल्लंघनच आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याशिवाय हे नियम न पाळणाऱया बँकांना कोटय़वधींच्या दंडाची तरतूद कायद्यात असल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या