
सामना प्रतिनिधी । मुंबई
विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबईच्या क्रिकेट संघाला रणजी या मानाच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवता आलेला नाही. आतापर्यंत चार सामने खेळलेल्या मुंबईला फक्त पाच गुणांचीच कमाई करता आलेली आहे. यापैकी एका सामन्यात त्यांना लाजिरवाण्या पराभवालाही सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राने येथे झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटातील लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळवले, तर मुंबईला एकच गुणावर समाधान मानावे लागले. दोन संघांमधील लढत ड्रॉ झाल्यामुळे आता महाराष्ट्राचा संघ सात गुणांसह सहाव्या स्थानावर, तर मुंबईचा संघ पाच गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
शेवटच्या नवव्या स्थानावर छत्तीसगढचा संघ आहे.महाराष्ट्राने सकाळच्या सत्रात 5 बाद 112 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार राहुल त्रिपाठीने 76 धावांची आणि सत्यजीत बच्छावने 37 धावांची खेळी केल्यामुळे महाराष्ट्राला 254 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून शिवम मल्होत्रा व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
आदित्य तरेची झुंज
महाराष्ट्राकडून मिळालेल्या 334 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने चेथ्या दिवसअखेरीस 5 बाद 135 धावा केल्या. यष्टिरक्षक व अनुभवी फलंदाज आदित्य तरे याने 7 चौकारांसह नाबाद 52 धावांची खेळी करीत मुंबईचा डाव सावरला. जय बिस्ता (6), सिद्धेश लाड (18), सूर्यकुमार यादव (5), अरमान जाफर (0) यांना अपयशाचा सामना करावा लागला. शुभम रांजणेने 35 धावांची खेळी करीत थोडाफार प्रतिकार केला. स्वप्नील गुगळेची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.




























































