
आयपीएलच्या 13व्या मोसमाला यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 मोसमांत झालेल्या स्पर्धांमध्ये कोणत्या संघांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे यावर दैनिक ‘सामना’ने यावेळी दृष्टिक्षेप टाकला. मुंबई इंडियन्स संघाने या स्पर्धेचे सर्वाधिक चारवेळा अजिंक्यपद पटकावत वरचष्मा दाखवला आहे. मुंबई इंडियन्सने ही स्पर्धा 2013, 2015, 2017 व 2019 या सालांमध्ये जिंकली आहे. यंदा होणाऱया स्पर्धेत हा संघ गतविजेता म्हणून जेतेपद राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहे.
चेन्नईचाही ठसा
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स या संघानेही आयपीएलमध्ये ठसा उमटवला आहे. या संघाने 2011 व 2012 सालांमध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला आहे. तसेच 2016, 2017 सालांमध्ये निलंबनाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर 2018 सालामध्ये जेतेपद पटकवत चेन्नई सुपरकिंग्सने झोकात पुनरागमन केले होते. हे त्यांचे तिसरे जेतेपद ठरले हे विशेष.
ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व यशस्वी
आयपीएलमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या कल्पक व आक्रमक नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने 2008 साली, अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सने 2009 साली आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने 2016 साली आयपीएल जिंकण्याची करामत करून दाखवली.
कोलकात्याचे जेतेपद ‘गंभीर’
हिंदुस्थानच्या गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने 2012 व 2014 साली आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच या संघाला 2017 व 2018 सालामध्ये तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. शिवाय 2011 व 2016 सालामध्ये चौथे स्थान या संघाने पटकावले.
आयपीएल स्पर्धा जिंकणारे संघ
मुंबई इंडियन्स चारवेळा
चेन्नई सुपरकिंग्स तीनवेळा
कोलकाता नाईट रायडर्स दोनवेळा
राजस्थान रॉयल्स एकवेळ
डेक्कन चार्जर्स एकवेळ
हैदराबाद सनरायझर्स एकवेळ





























































