रेवस बंदर गाळात रुतले; मुंबई आणि करंजा लाँच सेवेचे वेळापत्रक कोलमडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

एकीकडे जलवाहतुकीसाठी विविध प्रकल्प आणि योजना केंद्र सरकार अमलात आणत असताना जलप्रवासासाठी अत्यंत जुने आणि सुरक्षित मानले गेलेले रेवस बंदर मात्र गाळात रुतत चालले आहे. या बंदराची रंगरंगोटी सुरू असली तरी गाळामुळे लाँच सेवेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे रेवस-मुंबई आणि रेवस-करंजा या मार्गावरील वेळापत्रकच बदलण्याची पाळी लाँचमालक-चालकांवर आली आहे.

रेवस बंदरातून मुंबई आणि करंजा असा जलप्रवास सुरू आहे. 1 जून ते 31 सप्टेंबरपर्यंत रेवस-मुंबई हा प्रवास पावसाळी हंगामामुळे बंद असतो. परंतु करंजा ते रेवस हा जलप्रवास कमी अंतराचा असल्याने तो बाराही महिना सुरू असतो. रेवस आणि करंजा बंदर गाळात रुतत चालल्याने संकष्टी चतुर्थी व अन्य तिथीला ओहोटीच्या वेळी प्रवासात मोठे अडथळे निर्माण होतात.

सोपा मार्ग बंद होण्याची भीती
रेवस बंदरातील गाळ काढावा यासाठी गावकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर मेरिटाइम बोर्डाने गेल्या महिनाभरापासून तो उपसण्याचे काम सुरू केले आहे. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी असल्याचा आरोप होत आहे. गाळाची समस्या सुटत नसल्याने रेवस बंदरावर मुंबई जलवाहतूक व औद्योगिक संस्था यांच्या सूचनाफलकावर अखेर बदललेले वेळापत्रक लावण्याची वेळ आली आहे. ओहोटीमुळे लाँच गाळात अडकण्याची भीती असल्यामुळे वेळापत्रकात हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज 22 नोव्हेंबरपासून मापगावच्या कणकेश्वरचा जत्रोत्सव सुरू झाला आहे. गावाकडे जत्रेला येण्यासाठी सोपा मार्ग म्हणून मुंबईकर चाकरमानी रेवस बंदरातून येत असतात. परंतु गाळाच्या समस्येमुळे लाँचसेवा वेळेअभावी कोलमडू लागल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.