मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ची चाचणी धाव 14 जानेवारीपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

ही बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. मेट्रो 2A (डी.एन.नगर अंधेरी ते दहिसर ) आणि मेट्रो 7 (दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या मार्गावरील मेट्रोगाडीची चाचणी धाव 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दोन्ही मार्गांवरील काम हे 80 टक्के पूर्ण झालं असून काही महिन्यातच रुळावर ट्रेन चढवणे, सिग्नलिंग यंत्रणा आणि सगळी कामे पूर्ण होतील असे MMRDA चे आयुक्त आर.ए.राजीव यांनी सांगितले.

मेट्रोसाठीचे कोच हे देशांतर्गत बनवण्यात आले असून ते भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ही कंपनी डिसेंबरपर्यंत मुंबईतील अपेक्षित स्थळापर्यंत पोहोचवेल असे सांगण्यात आले आहे. 4 मेट्रो गाड्या या 10 जानेवारीपर्यंत मिळतील आणि 14 जानेवारीपासून चाचणी धावेला सुरुवात होईल असे राजीव यांनी सांगितले आहे. मकरसंक्रांतीच्या शुभेमुहुर्तावर चाचणी धावेला सुरुवात होणार आहे. ही धाव एक महिना घेण्यात येणार असून मे 2021 पासून प्रवाशांसाठी सेवेला सुरुवात होईल असे सांगण्यात आले आहे.

हे दोन मेट्रो मार्ग डिसेंबर 2020 मध्ये सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पूर्णत्वाची कालमर्यादा पुढे गेली होती. पहिली मेट्रो ट्रेन ही बंगळुरूवरून मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंत 10 मेट्रो गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. दोन्ही मेट्रो मार्गांवर 20-25 मिनिटांच्या अंतराने मेट्रो गाड्या सोडण्यात येणार आहे. कालांतराने दोन गाड्यांची संख्या वाढली की ही वेळ कमी केली जाईल.