
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्य सरकारची मोहीम मुंबई पालिकेकडून आक्रमकपणे राबवली जात असल्यामुळे ॲक्टिव्ह रुग्ण, संसर्ग त्याचबरोबर मृत्युदरातही घट होत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे 89 टक्क्यांवर पोहोचले आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 66 दिवसांवरून 171 दिवसांवर पोहोचला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेने गेल्या दीड महिन्यात भारी कामगिरी केली असून त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका ‘चेस द व्हायरस’ आणि ‘मिशन झिरो’च्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याच्या जोडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून अत्यंत प्रभावी अशी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही घराघरात जाऊन कोरोना संशयितांचा शोध घेणारी मोहीम 15 सप्टेंबरला सुरू झाली.
मुंबईत महापालिकेच्या कर्मचाऱयांमार्फत राबवली जात असलेल्या या मोहिमेत दोन वेळा वेगवेगळ्या टप्प्यात प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्याची माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे यात चूक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. संशयस्पद लक्षणे असल्यास त्याला तातडीने जवळच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे.
त्यामुळेच गेल्या दीड महिन्यांत या मोहिमेला प्रचंड यश आले आहे. त्याच जोडीला कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून याची संख्या 6500 वरून आता दरदिवशी 14 ते 16 हजार चाचण्यांवर पोहोचली आहे. या वाढत्या चाचण्यांमुळे कोरोना रुग्णांची अचूक माहिती मिळू लागली आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे यश
मुंबईत आतापर्यंत 35 लाख 2 हजार कुटुंबांपर्यंत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम पोहोचली असून यात लोकांचा घरात जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करून मास्क, सोशल डिस्टंन्सिग तसेच हात धुणे कसे आवश्यक आहे, याची माहिती देण्यात आली. मुंबईत मोक्याच्या 738 ठिकाणी मोठी होर्डिंग्ज लावण्यात आली. 3100 बसवर तर 1750 बस थांब्यावर ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही,’ ही घोषवाक्ये लावण्यात आली. 20 लाख दुकाने, कार्यालयात ‘मास्क नाही, प्रवेश नाही’चे स्टिस्कर लावण्यात आले. 40 लाख माहितीपत्रके वाटली तसेच वृत्तवाहिनी, वर्तमानपत्रे आणि रेडिओवर कोरोनाविरोधात जनजागृती करण्यात आली.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्येत 29 टक्क्यांनी घट.
सील इमारतींत 30 तर प्रतिबंधित क्षेत्रात 13 टक्क्यांनी घट. संसर्गाचे प्रमाण 0.41 टक्क्यांवर पोहोचले.
मृत्युदराचे प्रमाण 2.5 वर पोहोचले आहे. सध्या 7 हजार 817 बेड रिकामे आहेत.
561 आयसीयू बेड रिकामे आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण 24 टक्क्यांनी घटले.



























































