
सोशल मीडियावर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात आज खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भादंवि कलम 295 (अ) धार्मिक भावना दुखावल्याबाबत हा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याने खार पोलीस लवकरच कंगनाला चौकशीसाठी बोलावणार आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमी वादग्रस्त ट्विट करून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट अपलोड केली. शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी म्हणून संबोधले. तसेच हिंदुस्थानच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख धर्मियांना मच्छरसारखे चिरडले अशी ती पोस्ट होती. कंगनाच्या पोस्टनंतर शीख समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. आक्षेपार्ह ट्विट केल्याने कंगनाविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली.
सोमवारी दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीच्या शिष्टमंडळाने खार पोलीस ठाण्यात जाऊन कंगनाविरोधात कारवाईबाबतचे निवेदन पोलिसांना दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली होती. गुरुद्वारा कमिटीने दिलेल्या तक्रार अर्जानुसार आज खार पोलिसांनी कंगनाविरोधात भादंवि कलम 295 (अ) धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. कंगनाने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडेल असे ट्विट केले होते. वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात गुन्हा दाखल केला होता.






























































