
सामना ऑनलाईन, मुंबई
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारीही मुंबईकरांची पाठ सोडली नाही. रविवारी रात्री तर शहर आणि उपनगरात अक्षरशः धोधो कोसळला. मेघालयातील चेरापुंजी शहराला पावसाची जागतिक राजधानी मानले जाते, एवढा पाऊस तेथे कोसळतो. रविवारी-सोमवारी कोसळणाऱया पावसाने तर चेरापुंजीलाही मागे टाकले. मात्र एवढी संततधार होऊनही मुंबई काही थांबली नाही. काही भागात पाणी तुंबले, पण तेथे पाण्याचा लवकरच निचरा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी तुंबण्याची ठिकाणे यंदा कमी झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वे २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होती, पण धावत होती हे महत्त्वाचे! दोन दिवसांत सांताक्रुझ येथे २३१ मिमी तर कुलाब्याला ९९ मिमी पावसाची नोंद झाली.
वडाळय़ात भिंत खचली; १५ गाडय़ा खड्डय़ात पडल्या
मुसळधार पावसामुळे वडाळय़ात लॉइड इस्टेट इमारतीजवळ काम सुरू असलेल्या ‘दोस्ती’ इस्टेटच्या संरक्षक भिंतीचा भाग खचल्याने तब्बल १५ गाडय़ा खड्डय़ात पडल्या. यामध्ये पाच ते सहा गाडय़ा ढिगाऱयाखाली गाडल्या गेल्या. पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाडय़ा खड्डय़ात पडल्याने मोठा आवाज झाला.





























































