सायन्स शाखेत यंदा प्रवेशाची रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य मंडळाचा बारावी सायन्स शाखेचा निकाल घसरल्याने शेकडो विद्यार्थ्यांचा इंजिनीयरिंग आणि मेडिकल प्रवेशाचा मार्ग कठीण बनला आहे. करीअरची दिशा ठरत नसलेल्या विद्यार्थ्यांचा कल सध्यातरी एफवायची जागा राखून ठेवण्याकडे दिसत आहे. त्यामुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या सायन्स शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

मुंबई विभागातून सायन्सचे एकूण 73 हजार 963 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर उपलब्ध जागा 68 हजार 940 इतक्या आहेत. बारावी सायन्सनंतर बहुसंख्य विद्यार्थी पदवी न करता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे आतापर्यंत सायन्सच्या एफवाय प्रवेशात नामांकित महाविद्यालये वगळता फारशी स्पर्धा दिसत नव्हती. पण यंदा निकालाचा टक्का घसरल्याने विद्यार्थ्यांचा कल पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याकडे असेल, असे नॉन गव्हर्न्मेंट कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशनचे डॉ. टी. ए. शिवारे यांनी सांगितले.

इंजिनीयरिंग आणि मेडिकल प्रवेशात पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना पीसीएम (भौतिकशास्त्र्, रसायनशास्त्र्, गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र्, रसायनशास्त्र्, बायोलॉजी) मध्ये किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत.

पण यंदा सर्वाधिक घट गणिताच्या निकालात झाली असून गणिताचा निकाल 92.07 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हा निकाल 96.18 टक्के लागला होता. गणिताप्रमाणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र्, बायोलॉजीचा निकालही 5 ते 6 टक्क्यांनी खाली आला आहे.

विद्यार्थ्यांना आधार पूनर्मूल्यांकन आणि क्लास अप्रूव्हमेंटचा
अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे सायन्स शाखेचे बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी विद्यार्थी, पालकांनी शालेय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेही आपली बाजू मांडली आहे. ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत कमी गुण कसे मिळवतील असे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांसमोर पूनर्मूल्यांकन किंवा क्लास अपूव्हमेंट हे दोन पर्याय असून आपले गुण वाढविण्याची संधी आहे.